Sunday, October 7, 2018

नवरात्रोत्सवा बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी व नऊ रंगाचे महत्व


(संग्रहीत)

        आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व सन उत्सवांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक सणांची वेगळेपण व इतिहास आहे. साधारणत पोळा संपल्यानंतर सणांची रेलचेल सुरु होते. नुकताच गणेशोत्सव मोठ्या उत्सवात पार पडला. आता नवरात्रीची लगबग व तयारी सुरु झाली आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस हे सर्वांसाठी खूप भक्तीभावाचे आणि तेवढेच उत्साहाचे असतात. याच नवरात्रीत सर्वच वयोगटातील विशेषतः महाविद्यालयीन तरुण-तरुणी दांडियाचा (गरब्याचा)   आनंद घेतात. याच काळात घरामध्ये घट देखील बसवले जातात. जिथे देवीची प्राणप्रतिष्ठापणा होते त्या ठिकाणी मोठमोठे मंडप बांधले जातात. सगळीकडे दिव्यांची आरास, दांडिया रास आणि मनमोहक वातावरण पाहण्यास मिळते. परंतु हि नवरात्र का साजरी केली जाते. तुम्हाला माहित आहे का ?   विविध पंथ, संप्रदायामध्ये  नवरात्री विषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात येतात.

       आज आपण नवरात्रीबद्दल अजून थोडी माहिती जाणून घेऊया

     सर्वसाधारणपने  नवरात्री या शब्दाची फोड जर केली तर त्या शब्दाचा अर्थ ‘नऊ रात्र’ असा होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, वर्षातून सुमारे ४ वेळा नऊ रात्रीचा उत्सव येतो. पण त्यामधील आपण दोनच उत्सव साजरे करतो. त्या नवरात्री म्हणजे शरद नवरात्री आणि चैत्र नवरात्री. नवरात्र हा सण देवी दुर्गेचा महिषासूर राक्षसावरील मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. राक्षसांच्या अत्याचारांचा नाश करण्यासाठी देवतांनी दुर्गेची निर्मिती केली. महिषासुराने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण दुर्गेने लग्न करण्याआधी एका युद्धामध्ये स्वतःला हरवण्याची अट महिषासुराला घातली. हे युद्ध ९ दिवस आणि ९ रात्र चालले होते. दहाव्या दिवशी दुर्गा देवीचा विजय झाला आणि दुर्गेने म्हशीचे डोके असलेल्या वाईट वृत्तीच्या महिषासुराला ठार केले. म्हशीसारखे डोके असल्यामुळेच त्याला महिषासूर हे नाव दिले गेले होते.

     नवरात्रीचे नऊ दिवस देवीचे नऊ वेगवेगळे अवतार दर्शवतात. या नऊ दिवसांच्या दरम्यान देवीच्या नऊ वेगवेगळ्या अवतारांची पूजा केली जाते. प्रत्येक रात्रीचे देखील एक वेगळे रूप असते. पुराणांनुसार, भगवान रामांनी ९ दिवस देवीच्या ९ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली होती, परिणामी त्यांना रावणाला मारण्याची आणि सीतेला लंकेमधून सुखरूप परत आणण्याची शक्ती दुर्गेने प्रदान केली.

     एका  इंग्रजी वृत्तपत्राच्या लेखानुसार, देवी दुर्गेला आपल्या मातेला म्हणजेच पृथ्वीला भेटता यावे ह्यासाठी भगवान शंकरांनी वर्षातील ९ दिवस तिला मर्त्यलोकात जाण्याची परवानगी दिली होती आणि हाच तो ९ दिवस आणि ९ रात्रींचा कालावधी आहे. याचाच उत्सव म्हणून नवरात्री हा सण साजरा केला जातो. म्हणूनच बहुतेक लोक देवी दुर्गा आपल्या आईला पृथ्वीला भेटण्यासाठी आली आहे असे म्हणतात.

      नवरात्रीच्या नवव्या दिवशी लोक शस्त्रपूजन आणि आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या गोष्टींची पूजा करतात. भारताची सिलिकॉन व्हॅली समजल्या जाणाऱ्या बँगलोरमध्ये आयुध पूजेच्या दिवशी संगणक, सीडीज आणि सॉफ्टवेअर पुस्तकांची पूजा केली जाते. तसेच, वाहने, यंत्रसामग्री, रायफल्स इत्यादींची देखील पूजा केली जाते. शरद नवरात्री ही नऊ दिवस आणि नऊ रात्रींची असते. यामध्ये दर तीन दिवशी देवींच्या तीन अवतारांची पूजा केली जाते. यामधील पहिले तीन दिवस देवी दुर्गेची पूजा केली जाते. त्यानंतरचे तीन दिवस देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि शेवटच्या तीन दिवसांमध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते. आता जी नवरात्र सुरू आहे, ती शरद नवरात्र आहे.

     नवरात्रीचा शेवट दसऱ्याने म्हणजेच विजयादशमीने होतो. देशभरात हा सन रावण दहन म्हणून साजरा केला जातो.  याच दिवशी रामाने रावणाला मारून विजय साजरा केला होता, त्या क्षणाच्या स्मरणार्थ आणि वाईट गोष्टींवर विजय मिळवून चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

नवरात्रीचे नऊ रंगांचे महत्व ...

(संग्रहीत)

        नवरात्र उत्सव सुरू झाला की प्रत्येक जण विशेषतः महिलांना फारच उत्साह असतो. महिलांना या काळात रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या, ड्रेस घालायला मिळणार असते. नवरात्रात प्रत्येक जण रोज एका रंगात न्हाऊन जातो. नवरात्रीत विविध वृत्तपत्रे आपल्या वृत्तपत्रात सलग नऊ दिवस महिलांचे वेगवेगळ्या रंगातील साडी परिधान केलेली फोटो छापतात. व त्या रंगाचे महत्व सांगतात. फोटो छापण्याची सुंदर संकल्पना १२-१३ वर्षापूर्वी प्रथम महाराष्ट्र टाइम्सने मुंबईच्या महालक्ष्मी मंदीर ट्रस्टला सांगितली, ती त्यांनाही आवडली आणि तेव्हापासून ही नवरात्रीतील रंगांची किमया सुरू झाली. आणि नवरात्र नवरंगात रंगायला लागली. आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचे (वार) महत्त्व वेगळे आणि प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी-देवतांचा त्यावरून हे रंग ठरवले जातात. उदा. सोमवार महादेवांचा वार, भगवान महादेवांना पांढरा रंग आवडतो म्हणून पांढरा तसेच मंगळवार गणपतीचा वा, बाप्पाला लाल जास्वंद आवडते म्हणून लाल रंग अशाच प्रकारे संपूर्ण आठवड्यातील रंग ठरविले जातात. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्या रंगातून आपल्याला एक ऊर्जा मिळत असते. प्रत्येक रंग कशाचे तरी प्रतीक असतो हे आपण जाणून घेणार आहोत खाली रंग व त्याचे महत्व  सांगितले आहे. 


१. लालः ऊर्जेचा, प्रेरणेचा, सुवासिनीच्या कुंकवाचा.

२. निळा: अथांगतेचा, अवकाशाचा, अवकाशातून पाहताना आपल्या धरेचा.

३. पिवळाः नव्या दिशेचा अन् आशेचा, वैभवाचा आणि मांगल्याचा.

४. हिरवा: निसर्गाचा, समृद्धीचा, नववधूच्या हिरव्या चुड्याचा.

५. केसरी : उगवणाऱ्या सूर्याचा, शिवरायांच्या विजयी भगव्याचा, वारकर्‍यांच्या दिंडीतील पताकेचा.

६. गुलाबी : प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, सुखद स्वप्नांचा.

७. जांभळा : संयमाचा, दूरवर दिसणार्‍या सुंदर नगांचा. क्षोभ आणि शांतता यांच्या अजब मिलाफाचा.

८. पांढरा : पावित्र्याचा, कोमल सुंदर पारिजातकाचा, शीतल प्रकाश देणार्‍या चंद्राचा, शांततेचा.

९. काळा: गूढतेचा, मंगळसूत्रातील सौभाग्य मण्यांचा, बाळाला लावलेल्या तिटाचा, आषाढात बरसणार्‍या ढगांचा.

         सर्व रंगांचा मुख्य स्त्रोत खरेतर सूर्य आहे. सूर्य किरणांतूनच सात रंग आपल्याला मिळतात. लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा अन् जांभळा. हे सात रंग श्रावणातील इंद्रधनूत आपण लहान पणापासून पाहत आलो आहोत. या मुख्य रंगांचे पुन्हा प्रत्येकी तीन फिकट, नेहमीचा आणि गर्द असे प्रकार पडतात आणि असे 21 रंग तयार होतात. दोन तीन रंगांचे मिश्रण करून नवनवीन रंग तयार होतच असतात.

       सर्वांच्याच जीवनात रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंगांमुळे वेगवेगळी स्थिती समजू शकतो. हिरवाईने, फुला-फळांनी सजलेला निसर्ग, डोंगरदर्‍या,आकाशातील सुर्योदय व सुर्यास्ताच्या वेळचा विलोभनीय देखावा…ती रंगांची मुक्तहस्ते केलेली उधळण, हिरवीगार शेते, मोराचा सुंदर पिसारा बर्फाच्छादीत पर्वतरांगा, हिमशिखरे हे सगळे रंगामुळे देखणे आणि मनोहारी बनते. जर हे रंगच नसते तर वसंतातील, श्रावणातील नटलेला निसर्ग आणि शिशिरातील पानगळीचा निसर्ग,दुष्काळातील वाईट स्थिती, वाळवंट सर्व एकसारखेच वाटले असते. काही काही वेळा तर अशिक्षित लोकही फक्त रंगांचे माध्यम वापरून बर्‍याच गोष्टीआत्मसात करून घेतात. आपणही उदा. लाल रंगाचे निशान किंवा खूण दिसली की तिकडे जाणे निषिद्ध आहे,  धोक्याचे आहे, हे कळून येते. सिग्नलच्या दिव्यांमुळेप्रवासही सुलभ होतो. हे असे रंग आपल्या आयुष्यात भरून राहिले आहेत, तसेच सावळा गं रामचंद्र, घननीळा बरसला, निळकंठी महादेव, सावळ्या विठ्ठला, नीलवर्णी कृष्ण, पिवळेपितांबर,पिठूर चांदणे, काळेभोर केस, निळे डोळे अशी रंगांची विशेषणे  दैवी-देवता, पशू पक्षी, वस्तूना आपण लावत असतो. असे रंग आपल्या जीवनाचा भाग बनलेआहेत. वर्षभर रोज कोणीही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करत असले तरी नवरात्रात मात्र प्रत्येक दिवशी ठरलेल्या रंगांचेशकपडे घालून देवी-देवतांची उपासना करतात, मुलेमुली कॉलेजला जातात, नोकरदार  महिला-पुरूष वर्ग कार्यालयात जातात. यामुळे तेथील वातावरणात या नऊ दिवसात वेगळाच उत्साह असतो, सर्ववातावरण भक्तीने भारलेले असते. असे एकाच रंगात रंगलेले सर्वजण नवरात्रात जणू एकात्मकतेचा संदेशच देत आहेत, असे वाटते. चला तर मग मित्र-मैत्रिणींनो आपणही या नवरात्रीच्या नवरंगात रंगून जाऊ आणि त्या आदिशक्तीची आदीमायेची उपासना करू.

Tuesday, September 18, 2018

आपल्या शरीराबद्दल माहित नसलेल्या आश्चर्यकारक गोष्टी

       
आपल्या शरीराची रचना हि निसर्गाने अद्‌भुत केलेली आहे. कधीकधी माणसाच्या शरीराची तुलना यंत्राशी केली जाते. आपले शरीर काही यंत्र नाही, परंतु अनेक बाबतीत त्याची यंत्राशी तुलना केली जाऊ शकते. शरीरातही यंत्रासारखेच अनेक भाग असतात. आणि जसे यंत्राच्या प्रत्येक भागाचे काहीतरी विशिष्ट काम असते त्याचप्रमाणे शरीराचा प्रत्येक भाग एक विशेष कार्य करतो. पण सर्व भाग एकसाथ काम करतात आणि अशारितीने शरीर किंवा यंत्र सुरळीतपणे काम करत असते. आपल्या शरीरात   अनेक भाग, किंवा अवयव आहेत आणि प्रत्येक अंग काहीतरी आवश्यतक कार्य करते. शरीरातली एकही शीर, स्नायू अथवा इतर अवयव निरुपयोगी नाही. 
अशाच काही मानवी शरीराच्या आश्चर्यकारक गोष्टी :-  
फुफ्फुसे : - आपल्या फुफ्फुसात दररोज २० लाख लिटर रक्त हे रक्तवाहिन्या फिल्टर करु शकतात. जर फुफ्फुसाला ताणले तर तो टेनिस कोर्टाचा एक भाग कव्हर करेल.
रक्ताचा दररोजचा प्रवास : - आपल्या शरीरातील रक्त दररोज १,९२,००० किलोमीटर प्रवास करते. आपल्या शरीरात सरासरी ५.६ लिटर रक्त असते, जे एकदा प्रत्येक २० सेकंदात संपूर्ण शरीरात फिरते.
आपल्या ह्र्दयाचे ठोके : - प्रत्येक निरोगी व्यक्तीचे हृदय दररोज १००,००० वेळा ठोके मारते. ठोका एका वर्षात ३ कोटी पेक्षा जास्त वेळा मारला गेला आहे. हृदयावर पंपिंग करणे इतके जलद आहे की ते ३० फूट पर्यंत रक्त उसळु शकते.
कान-नाक-डोळे यांचा विकास :-  डोळे केवळ बालपणीच पूर्ण विकसीत होतात. नंतर त्यात विकास नाही. संपूर्ण आयुष्यभर नाक आणि कान वाढतात. कान लाखो आवाज मध्ये फरक ओळखू शकतात. कान १,००० ते ५०,००० हर्ट्झच्या दरम्यान ध्वनी तरंग ऐकतात.
शरीर एक कारखान्यापेक्षा कमी नाही : - आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदात २५ लक्ष नवीन पेशी तयार होतात. त्याच बरोबर प्रत्येक वर्षी २०,००० कोटीहून जास्त रक्तपेशी तयार केली जातात. प्रत्येक वेळी शरीरात २,५०,००० कोटी रक्ताच्या पेशी हजर असतात. एक थेंब रक्तात २५० लक्ष पेशी आहेत.
दाढी : - पुरुषांमध्ये दाढीचा केस वेगाने वाढतो. जर एखाद्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यभर दाढी केली नाही तर दाढी ३० फुट लांब असू शकते.
डोळ्यांचीसमोर सर्व कॅमेरे आणि दुर्बिण  फेल : - मानवी डोळा १ कोटी रंगांमधील बारीकातला बारीक फरक शोधू शकतो. सध्या जगातील कोणतीही अशी यंत्रे अस्तित्वात नाहीत कि ते डोळ्याशी स्पर्धा करता येईल.
डोळ्याच्या पापण्या : -  शास्त्रज्ञांचे असे मत आहे की पापण्या डोळ्यांतून घाम काढून टाकतात आणि डोळ्यांमध्ये आर्द्रता टिकवण्यासाठी उघडझाप करतात. पुरुषांपेक्षा स्त्रिया दुप्पट वेळा उघडझाप करतात.
नाक एक एअरकंडिशनर: - नाक म्हणजे एक नैसर्गिक एअर कंडिशनर आहे. जे अतिथंड हवेस कोमट आणि गरम हवा थंड करून फुफ्फुसांमध्ये पुरवठा केला जातो.
दर ताशी ४०० किमी वेग : - मजसंस्था, उर्वरित शरीरासाठी दर तासाला ४०० किलोमीटर वेगाने आवश्यक सूचना प्रसारित करते. मानवी मेंदूमध्ये १००,००० कोटीहून अधिक मज्जा पेशी आहेत.
संतुलित मिश्रण : -  शरीरात ७० टक्के पाणी आहे. याव्यतिरिक्त, कार्बन, जस्त, कोबाल्ट, कॅल्शियम,  मॅग्नेशियम, फॉस्फरस, निकेल आणि सिलिकॉन मोठ्या प्रमाणात आहेत.
शिंकेचा स्पीड ३०० किमी प्रतितास : - शिंकेच्या वेळी बाहेर येणारी हवा १६६ ते ३०० किलोमीटर प्रति तास असू शकते. शिंकताना डोळे उघडणे ठेवणे अशक्य आहे.
तोंडातील लाळ: - आपल्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ स्त्रवते. लाळ अन्न पचवते, तसेच जीभेच्या पृष्ठभागावरिल १०,० ०० पेक्षा अधिक स्वाद ग्रंथी ओलसर राहतात.
दात सांभाळुण वापरा : - मानवी दात पाषाणासारखे भक्कम आहेत. परंतु शरीराचे इतर अवयव स्वतःची काळजी घेतात, तर हानी झाल्याने दांत स्वत: ची दुरुस्ती (Recovery) करू शकत नाहीत.
बॅक्टेरियाचे कोठार : -  मानवी शरीराच्या १०% वजन हे शरीरातील उपस्थित जीवाणुचें आहे. एक चौरस इंच त्वचा मध्ये ३.२ लक्ष जीवाणू असतात.
नखे : - अंगठ्याचे नख सर्वात कमी वेगाने वाढते. तर्जनी, मध्यमा यांची नखे वेगाने वाढतात.
आहार : - एक व्यक्ती सहसा अन्नासाठी पाच वर्षांचा वेळ जेवणासाठी देते. वजनापेक्षा ७,००० पट आहार आयुष्यभर घेतो.
झोप : - झोपल्यामुळं, माणसाच्या शारिरीक उर्जेचे ज्वलण होते. मेंदू महत्त्वाची माहिती साठवतो. शरीराला आराम मिळतो आणि दुरुस्तीचे कार्य देखील केले जाते. झोपत असताना, शारीरिक वाढीसाठी आवश्यक हार्मोन्स स्रवत असतात.

Sunday, September 16, 2018

भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्याविषयी न ऐकलेली गोष्ट


    मित्रानो आपल्या देशात अनेक महान महात्मे  होऊन गेले कि त्यांच्या बुद्धिमत्तेने सारेच अव्वाक झाले. महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच देशभरात अनेक महात्मे व महान व्यक्ती होऊन गेले. त्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली  आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अशी कितीतरी नावे आपल्याला घेता येईल.ज्यांनी आपले आयुष्य या देशाच्या कल्याणासाठी खर्च केले. आज आपण ज्या महान व्यक्तीमत्वाविषयी जाणून घेणार आहोत ते म्हणजे डॉ. विश्वेश्वरया होत. दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांचा जन्म मोक्षगुंडम विश्वेश्वरैया जन्म १५, सप्टेंबर १८६१ रोजी मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, म्हैसूर राज्य सध्याचे कर्नाटक राज्यात झाला. डॉ. विश्वेश्वरया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, काही ठिकाणी, विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात, या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.डॉ. विश्वेश्वरया हे समर्थ अभियंते व नागरीक होते. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.
             डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वर हे श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे पुत्र होत. त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते.विश्वेश्वरया १५ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे ते निधन झाले. त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन मुद्देनहळ्ळी ला आले. विश्वेश्वरया यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
 अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत.या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. डॉ. विश्वेश्वरैया यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी ,स्टेट बँक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्ते बांधणीत त्यांनी योगदान केले.
       डॉ. विश्वेश्वरय्या यांनी कर्नाटक राज्यात आधुनिकतेचा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात तर सिंहाचा वाट उचलला होता. भारत पारतंत्र्यात असताना त्यांनी तिथे कृष्णासागर बांध, भद्रावती स्टील वर्क, मैसूर तेल आणि साबण कंपनी या बड्या कंपन्यांची स्थापना केली.बँक ऑफ मैसूर सारख्या प्रथितयश बँकेची उभारणी त्यांच्याच प्रयत्नातून शक्य झाली. या योगदानासाठी त्यांना “कर्नाटकचे भगीरथ” ही पदवीही मिळाली आहे.
डॉक्टर विश्वेश्वरय्या अवघ्या तिशीच्या वयात असताना त्यांनी दुष्काळात असल्याला कुक्कुर भागाला सिंधू नदीचे पाणी पुरवण्याची योजना तयार केली.ही योजना सरकारी अभियंत्यांच्या डोळ्यातून सुटली नाही. सरकारने सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी एक समिती बनवली व त्या समितीत विश्वेश्वरय्या यांना स्थान दिले. हे काम करत असताना त्यांनी धरणाच्या एका नव्या तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्यांनी धरणाचे पाणी अडवण्यासाठी स्टीलचे दरवाजे बनवले. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांच्या या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आजही हे तंत्रज्ञान जगभरात धरण बांधकामात वापरले जात आहे. याव्यतिरिक्तही भारतभरात अनेक ठिकाणी धरण बांधकाम आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीत डॉ. विश्वेश्वरय्या यांनी मोलाचे योगदान दिले.
'नाईट कमांडर ऑफ दी
ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक
भारतरत्न पदक 
     डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना म्हैसूर येथे असतांना जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविल्या गेले.भाला सत्र् मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविल्या गेले.आज आपण भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेल्या याच विश्वेश्वरया यांची एक रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत.   
डॉ. विश्वेश्वरैया एकदा रात्री रेल्वेने  प्रवास करीत होते. रात्रीची वेळ असल्याने सगळीकडे शांतता पसरली होती आणि याच शांततेमध्ये एक रेल्वे आवाज करत आपल्या पुढच्या स्टेशन कडे वाटचाल करत चालली होती. त्या रेल्वेमधील सगळे लोक या रात्रीच्या भयाण शांततेमध्ये झोपी गेले होते. त्यातीलच डॉ. विश्वेशरय्या हे ही खिडकीला डोके टेकून झोपलेले होते. अचानक डॉ. विश्वेश्वरैया  झोपेतून गडबडून जागे झाले. ते एकदम लगेचच आपल्या सीटवरून उठून उभे राहिले. आणि त्यानी त्याच्या डोक्यावर लटकणारी धोक्याची चैन ओढली.  चैन ओढताच रेल्वे स्लो झाली आणि थोड्या अंतरावर जाऊन थांबली. रेल्वेचे कर्मचारी, त्यांच्यासोबत त्या रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवासी आणि इतर डब्यांमधील लोक त्या डब्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी आले की,  नक्की काय झाले आहे.  काही लोकांना असे वाटले की, कदाचित या माणसाने झोपेमध्ये असताना चुकून चैन ओढली असेल. असा विचार करून काहीजणांना राग देखील आला होता. सर्व लोकांनी त्या माणसाला घेरले आणि त्याने असे काय केले याबद्दल विचारणा केली. त्यावेळी डॉ. विश्वेश्वरैया यांच्या या वागण्याचे काहीही वाईट न वाटून एकदम आरामात उत्तर दिले. ते म्हणाले की, “ रेल्वे रुळावर काही मीटर पुढे फट आहे, जर रेल्वे त्यावरून गेली असती तर अपघात होऊ शकत होता.” लोकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले आणि ते डॉ. विश्वेश्वरैया  यांना म्हणाले,  “काय सांगता, या काळोख्या रात्री रेल्वेमध्ये बसल्या – बसल्या तुम्हाला कसे कळाले  की, पुढे रेल्वे रुळामध्ये फट आहे ? काय मस्करी करता तुम्हीपण !”  त्यानंतर डॉ. विश्वेश्वरैया  म्हणाले ,  “मला चैन खेचून तुम्हाला सर्वांना त्रास द्यायचा नव्हता. तुम्ही जाऊन  रेल्वे रूळ तपासा आणि त्यानंतर मला येऊन सांगा.”  रेल्वे कर्मचारी रेल्वेमधून उतरून बॅटरी घेऊन रेल्वे रूळ चेक करू लागले. रेल्वे जिथे थांबली होती, त्याच्याच पुढे थोड्या अंतरावर रुळामध्ये मोठी फट पडली होती. जर रेल्वे त्या रुळाच्या फटीवरून गेली असती, तर या  काळोख्या रात्री, त्या भयाण जागेवर खरच एक मोठा अपघात झाला असता.  सर्व लोक परत डॉ. विश्वेश्वरैया  पोहोचले, त्यांनी या धोक्याबद्दल पूर्वसूचना दिली होती आणि त्यांनी डॉ. विश्वेश्वरैया  यांना विचारले की, तुम्हाला ही गोष्ट कशी काय माहित पडली ?
त्यावेळी डॉ. विश्वेश्वरैया यांनी सांगितले की,  “मी  झोपेमध्ये रेल्वे आणि रूळांचा आवाज ऐकत होतो आणि अचानक त्यांचा आवाज बदलला. रुळाच्या कंपनाने होणाऱ्या आवाजामध्ये अचानक आलेल्या मोठ्या फरकामुळे मला समजले की, रुळामध्ये पुढे नक्कीच एक मोठी फट आहे.  डॉ. विश्वेश्वरैया  या तत्परतेमुळे इतक्या लोकांचे प्राण वाचले होते. 
        डॉ. विश्वेश्वरैया  यांनी भरपूर अतुलनीय काम त्याच्या आयुष्यात केले. यासाठी त्यांनी पुरस्कारही मिळाले.  सुदृढ शरीरयष्टी आणि आरोग्याच्या जोरावर विश्वेश्वरय्या शंभरीपेक्षा जास्त काळ जगले. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी १४ एप्रिल १९६२ रोजी बंगलोर येथे अखेरचा श्वास घेतला आणि जाताना भारतातील अभियांत्रिकीच्या क्षेत्रात कधीच पुसला न जाणारा ठसा सोडून गेले.
       
डॉ.विश्वेश्वरैया यांची मुद्देनहळ्ळी येथील समाधी
                  १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात “इंजिनियर्स डे” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी गुगलने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपल्या होमपेज डूडल बनवून आणि त्यांच्या कार्यास अभिवादन केले.